“वाघांची दहाड फोडला पहाड…. “ क्रिकेटच्या स्पर्धेत हा आवाज एेकला की क्रिकेटरसिक हमखास समजतात कि, श्री नरेश ढोमे समालोचन करत आहेत. संपुर्ण भारतात सर्वात प्रसिध्द स्थानिक खेळ म्हणजे “टेनिस बॉल क्रिकेट” तसेच ग्रामीण भागात सर्वात जास्त गर्दी खेचणारा खेळ म्हणजे “टेनिस बॉल क्रिकेट” आणि त्यामुळे प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्यासाठी समालोचन हे आेघाने आलेच.
” टेनिस बॉल क्रिकेट” मध्ये कोणतेही भविष्य नसताना केवळ आवड व सभाधीटपणा यामुळे वयाच्या तेराव्या वर्षी नरेश ढोमेंच्या हातात माईक आला व ओघवत्या शैलीतुन त्यांनी गेले १५ वर्षे क्रिकेट रसिकांना भुरळ पाडली आहे. क्रिकेटच्या समालोचनातुन सामन्याच्या रसभरीत वर्णनाबरोबरच अनेक संदर्भ देण्याची त्यांची हातोटी प्रभावशाली आहे. क्रिकेटमधील अनेक किस्से, अनेक रेकॉर्डस, खेळाडुंचीे वैयक्तिक माहीती त्यांची तोंडपाठ आहे. विनोद, म्हणी, वाक्प्रचार, अभंग, श्लोक, ओव्या, कविता, सुविचार, शेरो- शायरी, एेतिहासिक दाखले, विज्ञानाविषयी संदर्भ चपखलपणे देऊन ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात व खेळाडुंना प्रोहोत्साहन देतात. याशिवाय स्रीभ्रुण हत्या, वृक्ष संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग, दारुबंदी, गावकी भावकीवरुन उद्भवणारे वाद यावर मिष्किल टिप्पणी करुन ते समाजप्रबोधनही करतात.
पिंपरखेड, ता. शिरुर( पुणे) या खेड्यातुन त्यानी समालोचनास सुरुवात केली. आपल्या अलौकीक प्रतीभेच्या जोरावर , पुणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्पर्धांसाठी त्यांना मोठी मागणी असते. तर अनेक आयोजक त्यांच्या उपलब्धतेनुसार स्पर्धांचे आयोजन करतात. श्री नरेश ढोमे हे बी. एस्. सी. पदवीधारक आहेत. MKCL चे संगणक प्रशिक्षण ते चालवितात. तसेच पिंपरखेड गावचे उपसरपंच पदही त्यांनी भुषविले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी व अनेक सामाजिक संस्थांवर काम करुन त्यांनी सामाजीक बांधीलकी जपलेली आहे. 10 वर्षापुर्वी समालोचन हा व्यवसाय आहे असे म्हटल्यावर कोणीही वेड्यात काढले असते. परंतु जिद्द, निष्ठा व प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवुन दिली आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन पुणे जिल्ह्यात १५ ते २० तरुण या क्षेत्रात आले आहेत. व स्पर्धांचे प्रमाण पाहता या सर्वांना खुप मागणी आहे. चंदु बोर्डे, संदिप पाटील अशा अनेक खेळाडुंनी नरेश ढोमेंचे भरपुर कौतुक केले आहे.